Home garden: बॅलकनीमध्ये सुंदर आणि साधी बाग तयार कशी करावी
शहरी जीवनात आपल्या बॅलकनीत एक सुंदर आणि ताजी हवा देणारी बाग तयार करणे म्हणजे जणू आपल्या घरात निसर्ग आणण्यासारखे आहे. छोट्या जागेतही तुम्ही काही साध्या उपायांनी सुंदर बाग तयार करू शकता. बॅलकनीत बाग तयार करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आणि कल्पना जाणून घेऊया.
जागेचे नियोजन करा
बॅलकनीतील जागा किती आहे, हे समजून घेऊन त्याचे योग्य नियोजन करा . जर बॅलकनी लहान असेल, तर घराच्या उंचीच्या आधारे विविध प्रकारचे झाडे लावण्यासाठी तुम्ही बाजारातील काही वस्तूंचा उपयोग करू शकता जसे की लोखंडी तार लाऊन त्या द्वारे झाडे तुम्ही वाढऊ शकता .त्याच बरोबर भिंतीवर टांगायच्या कुंड्या आणि रेलिंगवर झाडे लटकवण्यासाठी कुंड्या मिळतात याचा उपयोग तुम्ही जागेचे नियोजन करण्यासाठी करू शकता.
योग्य वनस्पतींची निवड
बॅलकनीमध्ये लावण्यासाठी कोणत्या वनस्पती योग्य असतील, याचा विचार करा. ज्या वनस्पती कमी प्रकाशातही चांगल्या वाढू शकतात अश्या वनस्पतीची लागवड तुम्ही करू शकता. जसे की, मनी प्लांट, स्नेक प्लांट, स्पाइडर प्लांट, इत्यादी वनस्पती तुम्ही निवडू शकता त्याच बरोबर जर तुमच्या बॅलकनीत पुरेसा सूर्यप्रकाश येत असेल, तर फुलझाडे जसे की गुलाब, मोगरा, चमेली इत्यादी लावा. तसेच, तुमच्या बॅलकनीत तुम्ही तुळस, पुदिना, हळदीची पाने, लसूण इत्यादी औषधी वनस्पती देखील लावू शकता.
भांड्यांची निवड आणि त्यांचा वापर
बॅलकनीत लावण्यासाठी योग्य भांडी निवडणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये तुम्ही प्लास्टिक, माती, सिमेंट किंवा मेटलची भांडी निवडू शकता. प्लास्टिकची भांडी हलकी असतात आणि तुटण्याची शक्यता कमी असते. तर मातीची भांडी पारंपारिक व नैसर्गिक दिसतात. तसेच, सिमेंटची भांडी मजबूत असतात आणि ही भांडी सजावटीतही भर घालतात. तुम्ही काही जुन्या वस्तूंचाही (जसे की चहा कप, टीनचे डबे) कुंड्या म्हणून वापर करू शकता.
योग्य माती आणि खतांचा वापर
वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी माती आणि खतांचा वापर खूप महत्त्वाचा आहे. मातीमध्ये तुम्ही नारळाच्या साली चा उपयोग करू शकता तसेच शेण खत देखील तुम्ही वापरू शकता ज्यामुळे मुळांना योग्य पोषण मिळेल. तुम्ही जैविक खते, कंपोस्ट, वर्मीकंपोस्ट, इत्यादीचा वापर करू शकता. वेळोवेळी मातीची खुरपणी करा आणि खत टाका, जेणेकरून झाडे निरोगी राहतील.
पाणी देणे
पाण्याचा योग्य वापर आणि व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. वनस्पतींना नेहमीच्या प्रमाणात पाणी द्या. उन्हाळ्यात जास्त पाणी देण्याची गरज असते, तर हिवाळ्यात कमी पाणी पुरेसे असते. पाणी देताना भांड्याच्या खालील पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र असले पाहिजेत. झाडांची मुळे पाण्यात बुडणार नाहीत याची काळजी घ्या.
बागेची देखभाल
तुमची बॅलकनी तील बाग ताजीतवानी आणि निरोगी ठेवण्यासाठी तिची योग्य काळजी घ्या. नियमितपणे झाडांची पानं काढा, सुकलेली फुलं तोडा, आणि वेळोवेळी झाडांची छाटणी करा, जेणेकरून त्यांची वाढ चांगली होईल.